- संतोष येलकर अकोला - गेल्या २७ दिवसांत उघडीप दिल्यानंतर शनिवार १९ आॅगस्ट रोजी अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा रेनकोट व छत्रीचा वापर सुरु केला. यंदाच्या पावसाळ्यात गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात जोरदार पाऊस बरसला. त्यामध्ये काही भागांत अतिवृष्टीदेखिल झाली होती. त्यामुळे जिल्हयातील सर्वच नदी व नाल्यांना पूर आल्याने, जिल्हयात पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर गेल्या २७ दिवसांच्या कालावधीत पावसाने दांडी मारत उघडीप दिली.
पावसाअभावी ताण आलेली खरीप पिके माना टाकण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्हयात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच, शनिवार १९ आॅगस्ट रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. या पार्श्वभूमीवर पावसापासून बचावासाठी गेल्या २७ दिवसानंतर नागरिकांनी पुन्हा रेनकोट, छत्रीचा वापर सुरु केल्याचे चित्र अकोला शहरात दिसत होते. वाहनधारकांकडून रेनकोटचा वापर तर कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून छत्रीचा वापर करण्यात येत असल्याचे दिसत आहे.