अकोला : वऱ्हाडातील मोठी बाजार पेठ असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील चार दिवस बंद राहणार आहे. बाजार समिती बंद असल्याचा परिणाम शेतमाल विक्रीवर दिसून येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने या काळात बँकांचे ऑडिटचे काम सुरू राहते. ३० व ३१ मार्च रोजी बँकांचे आर्थिक व्यवहार बंद राहतात. व्यापाऱ्यांसह सर्वांनाच बँकेतून कोणतेही व्यवहार करता येत नाही. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत विक्रीसाठी आणला तर त्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी व्यापारी वर्गाकडे ऐवढ्या प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध नसते. रविवारी सुटी व सोमवारी धुलिवंदन असल्याने व मार्च एण्डमुळे ३० व ३१ ला आर्थिक व्यवहार बंद राहत असल्याने बाजार समिती चार दिवस बंद आहे. १ एप्रिलपासून बाजार समितीचे व्यवहार सुरळीत सुरू होईल असे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले.
मार्च महिन्याचा शेवट असल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार बंद राहतात, त्यामुळे ३० व ३१ या दोन दिवशी बाजार समिती बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी आधी माहिती घेऊन माल विक्रीस आणावा.
- शिरीष धोत्रे, सभापती, कृउबास, अकोला