अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सभापती, उपसभापती पदाची निवडणूक होत असून, ही निवडणूक अविरोध होणार असल्याचे वृत्त आहे. शिरीष धोत्र यांचे नाव या बाजार समितीच्या सभापतीपदी आघाडीवर आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ६ सप्टेंबर रोजी पार पडली होती. ८ सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत सहकार पॅनलचे पंधराही उमेदवार विजयी झाले आहेत. तर अडते, व्यापारी व हमाल मतदारसंघातून तीन उमेदवार निवडून आले आहेत. सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आल्याने सभापती पदाची निवडणूक अविरोध होणार असल्याचे संकेत आहेत. उपसभापती पदाचे नाव अद्याप उघड झाले नसले तरी उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळय़ात पडते, हे निवडणूकअंतीच पुढे येणार आहे. दरम्यान, निवडून आलेल्या पंधरा उमेदवारांपैकी गत पाच वर्षाच्या कार्यकाळातील सहा संचालक आहेत, तर नवीन ९ संचालक निवडून आले आहेत. पण, सर्व सहकार पॅनलचे असल्याने कदाचित उपसभापती पदाची निवडणूक अविरोध होणार असल्याचे संकेत आहेत. सोमवारी बाजार समितीच्या गायवाडा सभागृहात ११ वाजता ही निवडणूक होणार आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची आज निवडणूक
By admin | Published: September 28, 2015 2:24 AM