अकोला : शिवणी विमानतळावरील धावपीच्या विस्तारीकरणाची शक्यता दुरावली आहे. विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) १५ मे रोजी राज्य शासनाचे मुख्य सचिव पी.एस. मीना यांना दिलेल्या पत्रात अकोला विमानतळावरून विमान उड्डाणचा परवाना न मिळण्याची शक्यता वर्तविली असल्याने विस्तारीकरणाचा प्रश्न कायमस्वरूपी मागे पडू शकतो. अकोला येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आणि सध्या आहे त्या धावपीची लांबी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून १७४.७६ एकर अतिरिक्त जागेची आवश्यकता भासणार आहे. याबाबतचा प्रस्ताव २00८ मध्ये मांडण्यात आला होता. विमानतळ प्राधिकरणाने त्यासाठी राज्य शासनाला आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. विमानतळाच्या एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग असून, दुसर्या बाजूला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने धावपी वाढविणे शक्य नसल्यामुळे पीडीकेव्हीची जागा अधिग्रहित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी एक दिवस आधी ४ मार्च रोजी राज्य शासनाने त्याबाबतचे आदेशही दिले होते. राज्य शासनाने विस्तारीकरणासाठी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात अकोला विमानतळावरून विमान उड्डाणाची परवानगीच मिळण्याची शक्यता दुरावली आहे. एएआयच्या कार्यकारी संचालक कल्पना सेठी यांनी १५ मे रोजी राज्य शासनाचे मुख्य सचिव पी.एस. मीना यांना एक पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये नागरी उड्डयन महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी उड्डयनाबाबतच्या आवश्यक उपाययोजना अकोला विमानतळावर नसल्यामुळे आणि येथून विमान सुरू करण्याची मागणी नसल्यामुळे अकोला विमानतळाला विमान उड्डयनाचा (एरोड्रोम लायन्सस) परवाना मिळण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी एएआयनेच विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव मांडला असल्याने ते अकोला विमानतळाचे विस्तारीकरण करणार किंवा नाही, याबाबत कार्यकारी संचालकांच्या पत्रातून काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. (प्रतिनिधी)
** पत्राची प्रत पीडीकेव्हीकडे!एएआयच्या कार्यकारी संचालकांनी राज्य शासनाला पाठविलेल्या पत्राची प्रत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाही मिळाली आहे. कृषी विद्यापीठाला एएआयचे पत्र मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
** १00 किलोमीटरमध्ये दोन विमानतळ ठरू शकते अडचण!अकोला येथील शिवणी विमानतळापासून १00 किलोमीटरच्या आत असलेल्या अमरावती येथे बेलोरा विमानतळाची निर्मिती झाली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासन येथील विमानतळाचा विकास झपाट्याने करीत आहे. अशा परिस्थितीत अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणात अडचणी येऊ शकतात.