- नितीन गव्हाळे अकोला - ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल अखेर मोठ्या गोंधळानंतर लागला आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून केंद्रनिहाय आणि शहरनिहाय विद्यार्थ्यांचे मार्क जारी करण्यात आले आहे. या अकोला जिल्ह्यातील १० विद्यार्थ्यांना ७०० हून अधिक गुण तर सुमारे ८६१ विद्यार्थ्यांना ५०० प्लस गुण मिळाले आहेत.
नीट परीक्षेसाठी अकोल्यात १७ परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या परीक्षा केंद्रांवरून एकूण ८ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याचे दिसून येते. नीट असो जेईई असो किंवा सीए इंटरमीडिएड, फायनल परीक्षा असो. या सर्वच परीक्षांसाठी अकोला शहर एज्युकेशन हब म्हणून उदयास आले आहे. या सर्व स्पर्धा परीक्षांच्या निकालांमध्ये अकोल्यातील विद्यार्थी बाजी मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थीसुद्धा शिक्षणाच्या दृष्टीकोनातून अकोला शहराला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. नीट परीक्षेत अकोला शहराने राज्यात सातवा क्रमांक पटकावला असून, या निकालाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अकोला पॅटर्न यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जारी करण्यात आलेली आकडेवारी पाहता, आता छोट्या शहरांमधील विद्यार्थी देखील आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांशी चांगली स्पर्धा करीत असल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातील १० विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक गुण प्राप्त केले आहेत.