- आशिष गावंडे अकोला: शहरात रामनवमीच्या रात्री दोन हत्या झाल्याच्या घटनेला सात दिवसांचा कालावधी उलटत नाही ताेच एका निर्दयी बापाने चुलत बहिणीच्या लग्नासाठी अकाेल्यात आलेल्या नऊ वर्षीय चिमुकल्या मुलीसह पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना रामदासपेठ पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील हनुमान बस्ती परिसरात बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून लग्नघरी दु:खाचे सावट पसरले आहे.
रश्मी मनिष म्हात्रे (३३) व माही मनिष म्हात्रे (९)रा. मुंबइ यांची हत्या झाली असून मनिष किसनराव म्हात्रे (३७)रा. हनुमान बस्ती संताेषी माता मंदिर जवळ अकाेला असे निर्दयी बापाचे नाव आहे. रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान बस्ती परिसरात संतोषी माता मंदिराजवळ म्हात्रे परिवार वास्तव्याला आहे. आराेपी मनिष म्हात्रे याच्या पुतणीचे २५ एप्रिल राेजी लग्न असल्यामुळे लग्न घरी पाहुणे एकत्र आले होते. पुतणीचे लग्न असल्यामुळे मनिषची पत्नी रश्मी व नऊ वर्षीय माही मुंबइतून अकाेल्यात दाखल झाले हाेते. विवाह सोहळ्यासाठी सर्व नातेवाइक व पाहुणे मंडळी एकत्र आल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण हाेते. मंगळवारी रात्री घरातील लग्नाची कामे आटोपल्यानंतर सर्व जण झोपी गेले. बुधवारी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास कुटुंबातील सर्व जण झाेपेत असतानाच आराेपी मनीषने पत्नी रश्मीसाेबत जुना वाद उकरून काढला. वाद वाढत गेल्यानंतर मनीषने मागचा पुढचा विचार न करता अचानक नऊ वर्षाची मुलगी माहीवर कुऱ्हाडीने घाव घातले.झाेपेत असलेली माही जागीच गतप्राण झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पाहून तिची आई रश्मी ओरडणार तोच क्षणाचाही विलंब न करता निर्दयी मनीषने रश्मी हिच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात पत्नी रश्मी जागेवरच मृत पावली. घरात हल्लकल्लाेळ माजल्याने घरातील नातेवाइक जागे झाले. मृत रश्मी व माहीचा मृतदेह पाहून नातेवाइकांनी एकच हंबरडा फाेडला. घटनेची माहिती मिळताच शहर पाेलिस उपअधिक्षक सतीष कुलकर्णी, रामदासपेठ पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांच्यासह ठसे तज्ञांनी घटनास्थळावर धाव घेतली. याप्रकरणी आराेपी मनीष किसनराव म्हात्रे याला अटक करण्यात आली.पत्नीवर संशय; नेहमी वादआराेपी मनीष म्हात्रे हा पत्नी रश्मीच्या वागणुकीवर संशय घेत असे. शिवाय पत्नीकडूनही त्याला टाेमणे मारून अपमान केला जात असल्यामुळे या दाेघा पती,पत्नीमधील वाद विकाेपाला गेल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या वादाला कंटाळूनच पत्नी रश्मी ही नऊ वर्षाच्या मुलीसह मागील पाच वर्षांपासून मुंबइत बहिणीच्या आश्रयाने राहत हाेती. म्हात्रे परिवारात लग्न असल्यामुळे दाेघी मायलेकी लग्नासाठी अकाेल्यात दाखल झाल्या हाेत्या. ...म्हणून मुलीला संपवले!पत्नीसाेबत वाद असताना नऊ वर्षीय मुलीला का मारले, असा प्रश्न पाेलिसांनी आराेपी मनीष म्हात्रेला केला असता, पत्नीला मारल्यानंतर मला शिक्षा हाेणार हे अटळ हाेते. त्यामुळे मुलीचा सांभाळ काेण करणार, या विचारातून मुलीला मारल्याची कबुली आराेपीने पाेलिसांना दिली. आराेपीला चार दिवसांची काेठडीम्हात्रे कुटुंबात लग्नाच्या आदल्या दिवशी हत्याकांड घडल्यामुळे संपूर्ण कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे पाेलिस ठाण्यात सहाय्यक पाेलिस उपनिरीक्षक संजय भगत यांच्या फिर्यादीनुसार आराेपी मनीष म्हात्रे विराेधात भादंवि कलम ३०२,३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून धारदार कुऱ्हाड जप्त केली आहे. आराेपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला २७ एप्रिल पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.