- अतुल जयस्वाल अकोला : गत अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली अकोला ते अकोट पॅसेंजर रेल्वे बुधवार, २३ जून रोजी अकोला स्थानकावरून रवाना झाली. दक्षीण मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्र. सहा येथे बुधवारी सकाळी ११ वाजता रेल्वेचा उद्घाटन सोहळा पार पडला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने ०७७१८ अकोला-अकोट पॅसेंजरला हिरवी झेंडी दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, विधान परिषद सदस्य आमदार डॉ. रणजित पाटील, रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चन मसने, नारायणराव गव्हाणकर उपस्थित होते. मान्यवरांनी रेल्वेस्थानकावर हिरवी झेंडी दिल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता रेल्वे अकोटकडे मार्गस्थ झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उगवा, गांधी स्मारक रोड व पाटसुल या स्थानकांवर रेल्वेचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी अनेक प्रवाशांनी अकोटपर्यंतचा प्रवास केला.
गुरुवारी (दि.२४)पासून ही गाडी रोज सकाळी ७ वाजता अकोला येथून रवाना होऊन सकाळी ८.२० वाजता अकोट स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात हीच गाडी अकोट येथून ९ वाजता रवाना होऊन, अकोला येथे १०.२० वाजता येणार आहे. दिवसभर येथे थांबल्यानंतर ही गाडी सायंकाळी ६ वाजता अकोला येथून रवाना होऊन सायंकाळी ७.२० वाजता अकोट स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी तिकडून रात्री आठ वाजता रवाना होऊन रात्री ९.२० वाजता अकोला स्थानकावर परत येईल. या गाडीला उगवा, गांधी स्मारक रोड व पाटसुल या स्थानकांवर थांबा असणार आहे.