अकोला : अकोट येथून एका लग्न सोहळ्यात भजनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून अकोल्याला परत येत असलेला युवक व महिला अशा दोघांचा वल्लभनगर जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे ६ वाजताचे दरम्यान घडली. संतोष मारोती गवई (२३, रा. बाळापूर फैल, खामगाव) आणि शालीनी विठ्ठलराव वेलनकर (रा. मोठी उमरी, अकोला) अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अकोट फैल पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मोठी उमरी स्थिती आॅटोरिक्क्षा चालक गणेश विठ्ठलराव वेलनकर यांनी अकोट फैल पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनूसार, त्यांची आई शालिनी विठ्ठलराव वेलनकर या लग्नसोहळ्यांमध्ये भक्ती गीत व भजनाचा कार्यक्रम करायच्या. याच अनुषंगाने त्या शुक्रवारी अकोट येथील बबन गटकर यांच्या घरी लग्नसोहळ्यात त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत गेल्या होत्या. शनिवारी पहाटे त्या संतोष मारोती गवई याच्यासोबत एम.एच. २९ पी. ९९८२ क्रमांकाच्या मोटारसायकलद्वारे अकोल्याकडे येत होत्या. दरम्यान, वल्लभनगर गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनचालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये संतोष गवई हा जागीच ठार झाला, तर शालिनी वेलनकर या गंभीर जखमी झाल्या. धडक दिल्यानंतर वाहनचालक तेथून पसार झाला. घटनेची वार्ता समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली तातडीने शालिनी वेलनकर यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. परंतु, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अकोट फैल पोलिसांनीही घटनास्थळाला भेट देऊन पंचानामा केला. गणेश वेलनकर यांच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.