अकोला: तालुक्यातील निंभोरा येथील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशीत केल्याने पित्त खवळलेल्या वाळू माफीयांनी ‘लोकमत’चे वल्लभनगर येथील वार्ताहर पद्माकर लांडे यांच्यावर मंगळवारी सकाळी प्राणघातक केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लांडे यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्या तक्रावरीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लोकमत चे वल्लभनगर येथील वार्ताहर पद्माकर लांडे यांनी पुर्णा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाचे सचित्र वृत्त १९ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. यामुळे वाळूचा उपसा करणाºयांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.
याचा राग मनात ठेऊन मंगळवारी सकाळी चार ते पाच जणांनी निंभोरा ते वल्लभनगर मार्गावर त्यांच्यावर पाईप व काठ्यांनी हल्ला केला. यामध्ये लांडे यांच्या पायाचे हाड मोडले असून, डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर लांडे यांना त्यांच्या कुटुंबियांनी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर उपचार असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी लांडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, वृत्तलिहिस्तावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.