- अतुल जयस्वालअकोला - जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अकोला व अकोला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत रविवार, ५ मे रोजी पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये भंडारा संघाने वाशिम संघाला, तर यवतमाळ संघाने गोंदिया संघाला पराभूत केले.
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळविल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भंडारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९.३ षटकांमध्ये सर्व बाद १३३ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना वाशिम संघाला २० षटकांमध्ये ९ गडी गमावून केवळ १३० धावा करता आल्या. त्यामुळे संघाला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ५८ धावा करणारा भंडाऱ्याचा सलामीवीर फलंदाज सिद्धेश वाठ हा सामनावीर ठरला. पंच म्हणून आशिष सोळंके व संजय बुंदेले, तर स्कोअरर म्हणून नीलेश लखाडे यांनी काम पाहिले.
उमरी येथील स्व. अरुण दिवेकर क्रीडांगणावर खेळविल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात यवतमाळ संघाने नाणेफेकचा कौल जिंकुन प्रथम फलंदाजीस करत १९.५ षटकांमध्ये सर्व गडी गमावत १३६ धावा उभारल्या. धावांचा पाठलाग करताना वाशिम संघाला १६ षटकांमध्ये सर्व गडी गमावत केवळ ७९ धावाच करता आल्या. ५७ धावांनी त्यांना पराभव स्विकारावा लागला. चार षटकांमध्ये केवळ चार धावा देत चार फलंदाजांना बाद करणारा यवतमाळचा गोलंदाज मिनार सहारे हा सामनावीर ठरला. पंच म्हणून अनिल एदलाबादकर व संदीप कपूर, तर स्कोअरर म्हणून सावरमल शर्मा यांनी काम पाहिले.