- रवी दामोदरअकोला - फ्रान्स देशाची राजधानी असलेल्या पॅरिस येथे ‘आर्चरी वल्ड कप’ स्पर्धा थाटात सुरू आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघात महाराष्ट्र राज्याच्या चार खेळाडूंचा समावेश असून, बुलढाण्याच्या प्रथमेश समाधान जवकार याने पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. तसेच इतर तीन खेळाडूंपैकी दोघांना सुवर्ण, तर एकाल ब्रॉन्झ पदक मिळाले आहे.
पॅरिस येथे दि.१६ ऑगस्टपासून ‘आर्चरी वर्ल्ड कप’ स्पर्धा रंगली असून, शनिवारी मेडल स्पर्धा झाल्यात. त्यामध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी प्रतिस्पर्धींवर मात करीत विजयाचा झेंडा रोवला. भारतीय संघात बुलढाणा येथील प्रथमेश समाधान जवकार, नागपूर येथील ओजस देवतळे, सातारा येथील आदिती गोपीचंद स्वामी व अमरावती येथील तुषार रोकडे यांचा समावेश आहे. स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत प्रथमेश समाधान जवकार, ओजस देवतळे, आदीती स्वामी यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले असून, तुषार रोकडे याला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघ प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्या नेतृत्वात खेळाडूंनी कामगिरी बाजावली आहे.
या वर्षातील प्रथमेशचे दुसरे गोल्डबुलढाण्याचा तिरंदाज प्रथमेश जावकर याने यापूर्वी झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या कंपाउंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या माइक श्लोएसरचा पराभव केला होता. भारताने ऑलिंपिकेतर स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली होती. त्यामध्ये प्रथमेशने गोल्ड व ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम या भारताच्या मिश्र सांघिक जोडीने कोरियन संघाचा पराभव करत विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले होते.