अकाेला : लॉकडाऊननंतर सहा महिन्यांनी राज्य परिवहन महामंडळाची सेवा काही अटी व शर्तीवर सुरू केली हाेती. ती आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. एकीकडे अर्थकारण रुळावर आणण्यासाठी ही बाब आवश्यक हाेतीच; मात्र प्रवाशांनी खबरदारी घेऊन प्रवास करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र बेफिकीर वृत्तीच अधिक असल्याचे समाेर आले आहे. अशा हलगर्जीमुळे काेराेनाचा प्रसार करणारे हाॅटस्पाॅट म्हणून बसस्थानक समाेर येऊ शकते. कोरोनाचे नियम पाळून गाड्या सुरू करण्याचा आदेश महामंडळाने दिला. तरीसुद्धा बसस्थानकावर सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. येथे प्रवाशांमध्ये अंतर राहत नाही. अनेक जण मास्क घातलेले नसतात. बसस्थानक परिसर, प्लॅटफार्म आणि रेल्वेगाड्यातही हे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले. अशा स्थितीत बसस्थानक तर कोरोनाचे वाहक होणार नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवाशांनी तोंडाला मास्क लावणे, आपसात दोन फुटांचे अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी नियमांचा समावेश आहे; परंतु नागपूर रेल्वेस्थानक परिसर, प्लॅटफार्म आणि रेल्वेगाड्यांमध्ये या नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे केवळ गाड्या सुरू करणे हेच महामंडळाचे ध्येय असून, कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी काहीच यंत्रणा नसल्याची बाब सिद्ध झाली. या बाबींमुळे बसस्थानकाच्या माध्यमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे.
असे आहे चित्र
स्थानकाच्या परिसरात प्रवासी दाटीवाटीने उभे होते. त्यांच्यात अर्ध्या फुटापेक्षाही कमी अंतर होते. प्लॅटफार्मवर गाडी येण्याच्या प्रतीक्षेत प्रवासी
घोळका करून उभे होते. लवकर गाडीत चढताना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे भान कुणालाही नव्हते. कोचमध्येही प्रवासी एकमेकांना स्पर्श होईल असे बसलेले दिसले.
कर्मचाऱ्यांमध्ये भीती
प्रवास करणारा एखादा पॉझिटिव्ह प्रवासी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्यास संपूर्ण कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या साेबतच अनेक रुग्ण काेराेना चाचणीसाठी अकाेल्यात येतात आणि अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत पुन्हा घरी परतात. या दरम्यान असे प्रवासी अनेकांना संक्रमित करण्याचा धाेका कायम आहे.