अकोला: अमरावतीला घेण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या पदभरती परीक्षेसाठी अकोल्यातील ४० पेक्षा जास्त परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार रविवारी समोर आला. रेल्वे गाडी उशिरा पोहोचल्याने परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला; परंतु परीक्षा सुरू होण्यास १५ मिनिटांचा अवधी शिल्लक होता. तरीदेखील परीक्षेला बसू न दिल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेंतर्गत रविवारी विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. अकोल्यातील उमेदवारांना परीक्षेसाठी अमरावती येथील बाबासाहेब वर्दे एज्युकेशन सोसायटी डीटीईडी कॉलेज हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परीक्षा रविवारी दुपारी ४ वाजता सुरू होणार होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दुपारी २.३० ते ३.३० वाजताच्या दरम्यान नोंदणीची वेळ देण्यात आली होती. त्यानुसार, अकोल्यातील बहुतांश परीक्षार्थींनी महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या प्रवासाला प्राधान्य दिले; परंतु ऐन वेळेवर या रेल्वेला उशीर झाल्याने परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास १० ते १५ मिनिटे उशीर झाला. तोपर्यंत परीक्षा केंद्रावर नोंदणीचा कालावधी संपला होता; मात्र प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास आणखी काही अवधी शिल्लक होता. असे असले तरी या परीक्षार्थींना पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगत त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. झालेल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली तरी परीक्षार्थींना परीक्षेपासून मुकावे लागल्याने परीक्षार्थींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.अकोल्यातच हवे परीक्षा केंद्रस्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जवळपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थी अकोल्यात वास्तव्यास आहेत. एक मोठे शैक्षणिक हब म्हणून अकोल्याची ओळख आहे. असे असले, तरी येथील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी अमरावती गाठावे लागते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागते. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी अकोल्यातच केंद्र मिळावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.