- संजय खांडेकर
अकोला: आॅनलाइन बँकिंगच्या व्यवहारात फसवणुकीच्या घटना वाढल्यामुळे ग्राहक त्रासले असून, बँकांचे अधिकारी चौकशीच्या नावाखाली वेळकाढू धोरण अवलंबित आहेत.नोव्हेंबर-१७ मध्ये हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली. नोटबंदीनंतर देशभरातील आर्थिक व्यवहार विस्कळीत झाल्यानंतर पर्याय म्हणून आॅनलाइन व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डवरून मोठ्या प्रमाणात आॅनलाइन व्यवहार सुरू झालेत; मात्र सदर व्यवहार करीत असताना अनेकांना तांत्रिक बाबींचे ज्ञान नसल्याने नव्या अडचणी सुरू झाल्यात. साक्षरतेअभावी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना आॅनलाइन आर्थिक व्यवहार करताना त्रास होत आहे. त्यामुळे अनेकांच्या एटीएममधून रकमा काढल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकें च्या खातेदारांच्या रकमा परस्पर उडविल्या जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबईत आणि ठिकाणावरून या रकमा काढल्या गेल्याच्या तक्रारी अकोल्यातील पोलीस ठाणे आणि सायबर क्राइमच्या गुन्हे शाखेकडे आल्या आहेत. ज्या बँक खातेदाराच्या खात्यातून या रकमा काढल्या गेल्यात, त्यांनी याबाबत संबंधित बँकांकडे तगादा लावला; मात्र मोठा कालावधी होऊनही याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.बँक सिक्युरिटी कायद्यातील तरतुदीआॅनलाइन, इलेक्ट्रॉनिक मीडियातून आर्थिक फसवणूक झाली असेल विमा काढलेल्या रकमेतून ग्राहकास रक्कम देण्याची तरतूद आहे. दहा दिवसात समाधान करणे गरजेचे आहे. पोलीस तक्रार आणि विमा प्रकरणीच्या सर्व तक्रारी बँकेनेच कराव्यात; मात्र या कायद्याच्या तरतुदीनुसार ग्राहकाला न्याय मिळत नाही.
आॅनलाइन आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्यास तीन दिवसांच्या आत बँकेच्या व्यवस्थापकाकडे आॅनलाइन तक्रार करणे आवश्यक आहे. त्यानंतरही जर दखल घेतली जात नसेल तर वरिष्ठांकडे दाद मागता येते. आठ दिवसांच्या आत पुन्हा स्मरणपत्र जोडावे. चौकशी करून तातडीने न्याय देण्यासाठी कायदा संमत झाला आहे.- तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक अकोला.