अकाेला : जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात काेराेना विषाणूने थैमान घातले आहे. शहरात दरराेज किमान २००पेक्षा अधिक जणांना काेराेनाची लागण हाेत आहे. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये इतर जिल्ह्यातूनही काेराेनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल हाेत आहेत. यामुळे रुग्णालयांमध्ये अनेकदा खाटांची कमतरता निर्माण हाेऊन वैद्यकीय सेवेवर ताण येत आहे. अशास्थितीत काेराेनाबाधित रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशातून मनपा प्रशासनाने काेराेना हेल्पलाइन कक्षाचे गठन केले असून, याठिकाणी नागरिकांसाठी २४ तास सुविधा उपलब्ध केली आहे. मनपात २५ मार्च राेजी काेराेना हेल्पलाइन कक्षाचे गठन केल्यापासून ते १७ एप्रिलपर्यंत या कक्षात खाटांची माहिती विचारण्यासाठी केवळ ११ वेळा संपर्क साधण्यात आल्याची माहिती समाेर आली आहे.
अकाेलेकरांनाे हा घ्या हेल्पलाइन क्रमांक !
महानगरपालिका कार्यालय येथे २४ तास माहिती कक्षात कर्मचारी तत्पर आहेत. संपर्क साधण्यासाठी मनपाने टोल फ्री क्रमांक १८००२३३५७३३ आणि दूरध्वनी क्रं. ०७२४-२४३४४१२ कार्यान्वित केले आहेत. याठिकाणी खाटांची माहिती घेण्यासाेबतच काेराेनाची लागण झालेला रुग्ण घराबाहेर फिरत असले तर तक्रारीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन मनपाने केले आहे. काेराेनाबाधित रुग्णाची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गाेपनीय ठेवल्या जाणार आहे.
मनपात तीन जणांचा कक्ष
महापालिकेत गठित केलेल्या हेल्पलाइन कक्षात तीन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सकाळ व दुपारच्या सत्रात प्रत्येकी दाेन महिला शिक्षिका तसेच रात्री दाेन पुरुष व त्यांच्या मदतीसाठी एक दूरध्वनी संचालकाचा समावेश आहे़ दुपारी संपर्क साधला असता मनपा हिंदी शाळा क्रमांक ६ मधील शिक्षिका मंजूषा भुसारी, प्रीती चंदनबटवे यांनी रुग्णालयांतील उपलब्ध खाटांची तातडीने माहिती दिली.
खाटांची उपलब्धता आहे का ?
शहरातील रुग्णालयांमध्ये इतर जिल्ह्यातील रुग्ण दाखल हाेत असल्याने अनेकदा खाटांची कमतरता निर्माण हाेते. परिस्थिती लक्षात घेता रुग्णालयांत खाटांची उपलब्धता आहे का, अशी विचारणा केली जात आहे़
नागरिक संपर्क साधत नाहीत हीच अडचण !
शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ हाेत चालली आहे. अशावेळी नागरिकांनी मनपाच्या हेल्पलाइन क्रमांकाचा फायदा घेण्याची गरज असताना ते संपर्क साधत नाहीत, हीच खरी अडचण असल्याचे यावेळी दाेन्ही शिक्षिकांनी सांगितले. मनपाचा संगणक कक्ष व दूरध्वनी कक्षाकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाइकांना उपलब्ध खाटांची माहिती देण्यासाठी कक्ष गठित केला आहे. संपर्क साधण्यात आलेल्या नागरिकांचा भ्रमणध्वनी क्रमांक, नाव, पत्ता आदी बाबींची नाेंद केली जाते.
-डाॅ. अस्मिता पाठक, वैद्यकीय आराेग्य अधिकारी, मनपा