अकोला : पश्चिम वऱ्हाडातील सर्वात मोठे शहर, सर्वात मोठी औद्योगिक वसाहत, रेल्वेचे जंक्शन, एज्युकेशन हब अन् सर्वात मोठे शासकीय रुग्णालय, यामुळे सदैव गजबजलेल्या शहरामध्ये नीरव शांतता उत्तररात्रीच बघायला मिळते; मात्र रविवारची सकाळ उजाडली ती शांततेची हाक देऊन. संपूर्ण दिवसभर शहरातील कोणत्याही रस्त्यावर कोणीही नव्हते. खासगी वाहतूक पूर्णत: बंद होती. रेल्वे स्थानक, बसस्थानकावरून नियाेजित बसफेऱ्या सुरू हाेत्या मात्र प्रवाशांची गर्दी नव्हतीच. कृषी उत्पन्न बाजार समिती, धान्य बाजार, मध्यवर्ती मार्केटसह किरकोळ विक्री दुकानेही बंद ठेवण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच वैद्यकीय कामासाठीच घराबाहेर पडलेल्या बाेटावर माेजता येतील अशा लाेकांचा अपवाद वगळला तर रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र सायंकाळपर्यंत पाहावयास मिळाले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमण टाळण्याच्या उद्देशाने रविवारी पुन्हा एकदा संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली हाेती. या संचारबंदीला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जिल्हाभरात प्रतिसाद दिला. काेणीही नाहक रस्तावर उतरले नाही त्यामुळे पाेलिसांना बळाचा वापर करण्याची गरजच पडली नाही
संचारबंदीच्या पार्शवभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. ऑटो, सिटी बस सेवा बंद असल्याने रुग्णांसह अडकलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहोचवून देण्याचे कामही पोलिसांनी केले. शहरातील खानावळी, हॉटेल्स, सुपर शॉपीही बंद होत्या. जनता बाजारातील भाजी बाजार, जुना भाजी बाजार, धान्य बाजार, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सर्वच प्रतिष्ठाने बंद होती. वृत्तपत्र, दूध विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे कामकाज केले. सकाळी काही तासांसाठी दूध, वृत्तपत्रे वितरणासाठी सवलत देण्यात आली हाेती. त्याच वेळेत ही कामे पूर्ण करण्यात आली विशेष म्हणजे औषधी दुकानेही माेठ्या प्रमाणात बंद हाेती. ग्रामीण भागातही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. तालुका मुख्यालयासह मोठी गावे व रविवारचे बाजारही कुठेही भरले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच ठप्प झाला होता..