अकोला: मतदार जनजागृती व एसव्हीईईपी कार्यक्रम अंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी जागृती व्हावी व त्यामधून पर्यावरण संवर्धनाचे संस्कार व्हावे, या उद्देशाने अकोला जिल्हा निवडणूक अधिकारी निसर्गकट्टा व निसर्गप्रेमी संस्था यांच्या वतीने शहर पक्षी निवडणुकीचे आयोजन केले आहे. शहरातील ८० शाळा व १२ महाविद्यालयातून ही निवडणूक घेण्यात येणार आहे.या निवडणुकीची माहिती मतदार जनजागृती करण्याकरिता शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, रलातो महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, मेहरबानू महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल, शहाबाबू उर्दू हायस्कूल, समता विद्यालय, संताजी कॉन्व्हेंट, स्कूल आॅफ स्कॉलर्स येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये दीपक जोशी, उदय वझे, राजू तेलकर, संदीप सरडे, प्रा.डॉ. मिलिंद शिरभाते, प्रा.डॉ. नगराळे, प्रा.डॉ. राजा, अमोल सावंत, अजिम शेख, शिवा इंगळे, गौरव झटाले, यश देशमुख, दीप्ती घाटे, माधुरी अंभोरे, कल्याणी देशमुख, प्रतीक्षा, अश्विनी धर्मे, वैष्णवी यांनी मार्गदर्शन केले. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाला निकाल घोषित करण्यात येईल. कार्यशाळेत उमेदवार पक्ष्यांची माहिती देण्यात आली. मतदानाबाबत माहिती देण्यात आली. शहरातील ८० शाळा व १२ महाविद्यालयातून निवडणूक घेण्यात येणार आहे.निवडणूक अधिकारी, अकोला वन, वन्यजीव व सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र पक्षीमित्र, निसर्गकट्टा, आधार फाउंडेशनन, ब्ल्यू मॉरमन नेचर क्लब, अजिंक्य साहसी संघ, बर्ड लव्हर्स ग्रुप, सृष्टी वैभव, वायएचए, ईएफईसी, किंग कोब्रा अॅडव्हेंचर अॅन्ड रिसर्च फाउंडेशन, विविध महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग उपक्रम यशस्वीतेकरिता प्रयत्न करीत आहेत.