नितीन गव्हाळे / अकोलाअकोला: उन्हाळय़ात शरीराचे तापमानसुद्धा वाढलेले असते. रक्तदान करण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित पाहिजे. त्यामुळे उन्हाळय़ात रक्तदान करणार्या दात्यांची संख्या चांगलीच रोडावते. यंदाच्या उन्हाळय़ातही रक्तदानाचे प्रमाण प्रचंड घसरल्याने, शासकीयसह खासगी रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. एकीकडे याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांवर रक्तासाठी धावपळ करण्याची वेळ येते. शासकीयसह खासगी रक्तपेढय़ांमध्ये तीन-चार दिवस पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे. रक्तपेढय़ांमध्ये रक्तदानाची परिस्थिती गंभीर असल्याने, रक्तपेढय़ांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. शहरातील सर्वोपचार रुग्णालय, स्त्री रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण अकोला, बुलडाणा, खामगाव, कारंजा, वाशिम, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर आदी भागातून येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यांना रक्तपुरवठा करणार्या दोन शासकीयसह आठ खासगी रक्तपेढय़ा आहेत; परंतु सर्वच रक्तपेढय़ांमध्ये जेमतेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे. विशेषत: 'निगेटिव्ह' ग्रुपच्या रक्ताची चणचण आहे. काही रक्तपेढय़ा 'निगेटिव्ह' ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त देत आहे. इतर ग्रुपमध्ये 'एबी', 'ओ' व 'बी' पॉझिटिव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची माहिती आहे.
अकोला शहरात रक्ताचा तुटवडा!
By admin | Published: May 20, 2016 1:39 AM