अकोला : वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरातील रस्त्यांवर विनापरवाना आणि कागदपत्रे नसतानाही धावणार्या ५२ ऑटोरिक्षा जप्त केल्या. शहरामध्ये अशा प्रकारे तीन हजार ऑटोरिक्षा धावत असून, चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावकार यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. शहराची आधीच बेताल वाहतूक आणि त्यात बेशिस्त ऑटोरिक्षांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ऑटोरिक्षाचालक रस्त्यांवर बेधडकपणे वाहन चालवितात. मोटारसायकल, सायकलला धडक देतात आणि वरून स्वत:च वाद घालून हाणामारीसुद्धा करतात. मिळालेल्या माहितीनुसार, शहरामध्ये तीन हजार ऑटोरिक्षा विनापरवाना धावत आहेत. विशेष म्हणजे, जुने झाल्यानंतरही रंगरंगोटी करून रस्त्यावर आलेल्या ऑटोरिक्षा पुष्कळ अहेत. वाहतून नियंत्रण शाखेमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून आलेले प्रकाश सावकार यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील बेशिस्त मोटारसायकस्वारांविरुद्ध विनानंबरप्लेट, फॅन्सी नंबरप्लेट, विनापरवाना वाहन चालविणे, कागदपत्रे सोबत न बाळगणे अशा बाबींसाठी कारवाई केली. आता सावकार यांनी शहरातील विनापरवाना धावणार्या ऑटोरिक्षांची यादी मागवून कारवाईस सुरुवात केली. सोमवारी त्यांनी बसस्टँड चौक, टॉवर चौक, गांधी रोड परिसरात ५२ ऑटोरिक्षांवर कारवाई केली. ऑटोरिक्षांवर झालेल्या कारवाईमुळे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने १0 दिवसांसाठी या ऑटोरिक्षा जप्त केल्या.
अकोला शहरात ५२ ऑटोरिक्षा जप्त
By admin | Published: December 30, 2014 1:13 AM