अकोला : शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली असून, दोन महिन्यांपासून अकोल्यातील नागरिकांना वीज बिल मिळालेले नाही. उशिराने मिळत असलेल्या वीज बिलांचा फटका विनाकारण ग्राहकांना सहन करावा लागत आहे.अकोला शहरातील १ लाख १५ हजार लोकसंख्येच्या ग्राहकांना दर महिन्याला विद्युत बिलांचे वाटप करावे लागते. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने तीन उपविभाग पाडले आहे. या उपविभागातून अकोला शहराची वीज वितरण प्रणाली आणि बिल वसूल करण्याची प्रक्रिया चालते. अकोला शहरवासीयांना गेल्या दोन महिन्यांपासून नियमित वीज बिल मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. याबाबत विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वीज बिल वितरणाचा कंत्राट दोन महिन्यांपूर्वी संपुष्टात आल्याने अकोला शहरातील अनेक ग्राहकांना वीज बिल वितरित झाले नसल्याचे समोर आले. वीज बिल वितरण करणाऱ्या कंत्राटदाराचा करारनामा जर २१ मार्च रोजी संपुष्टात येणार होता, तर कंत्राट काढण्याची प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारीपासून सुरू करायला पाहिजे होती; मात्र तसे न करता गत दोन महिन्यांपासून नागरिकांना अडचणीत आणण्याचे आणि ग्राहकांना व महावितरण कंपनीला हानी पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. वीज बिल वितरणाचा कंत्राट संपुष्टात आल्याने आता कंत्राटदार आणि खासगी एजन्सीला अतिरिक्त दराने वीज बिल वितरणाचे काम नव्याने दिले आहे. मार्च महिन्यापर्यंत काम करणाºया कंत्राटदाराने ४१ टक्के उतरत्या दराने वीज बिल वितरणाचे काम केले आणि दोन महिन्यांपासून शंभर टक्के दराने वीज बिल वितरणाचे काम सुरू आहे. एवढे असूनही अकोल्यातील हजारो ग्राहकांना दोन महिन्यांचे वीज बिल मिळालेले नाही. त्यामुळे ओरड सुरू झाली आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे दोन महिन्यांच्या बिल वितरणास विलंब झाल्याने अकोल्यातील ग्राहकांना लेटचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. सोबतच दोन महिन्यांच्या बिल वितरण कामकाजावर महावितरणला मोठा खर्च करावा लागला, तो वेगळा.