अकोला : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण विधळे आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. गमे यांची शनिवारी बदली करण्यात आली आहे. अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी म्हणून व्ही.व्ही. माने व महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून ओ.पी. बकोरिया यांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात आली आहे. राज्य शासनामार्फत राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी काढण्यात आले. त्यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवे जिल्हाधिकारी म्हणून जळगाव खान्देशचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांची मुंबई येथे कामगार विभागाचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे येथील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व्ही.व्ही. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ह्यमहाबीजह्णचे व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. गमे यांची उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी महाबीजचे नवे व्यवस्थापकीय संचालकपदी औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त ओ.पी. बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला जिल्हाधिकारी, सीईओ, महाबीज ‘एमडीं’ची बदली!
By admin | Published: April 23, 2017 8:55 AM