अकोला : पत्रकारांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल उद्या सोमवारी ४ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.निवासस्थानावर वरिष्ठ पत्रकारांना बोलावून त्यांच्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रकार जिल्हाधिकाºयांनी केला होता. ३१ डिसेंबरच्या सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्याच्या प्रसिद्धिमाध्यमांमध्ये संतापाची लाट उसळली होती. निवेदने देत शासनाकडे निषेध नोंदविण्यात आला. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला. त्यांनी १७ जानेवारी रोजी अकोल्यात येत सहा पत्रकारांची ‘इनकॅमेरा’ साक्ष नोंदविली. सोबतच या बाबतीत मोर्णा फाउंडेशनच्या तीन पदाधिकाºयांची साक्ष नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले; मात्र त्यांनी समितीसमोर येणे टाळले. अकोल्यात साक्ष न झाल्याने त्यांना अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून साक्ष दिल्याची माहिती आहे.मोर्णा महोत्सवाला अपेक्षेप्रमाणे प्रसिद्धी न दिल्याचा राग मनात ठेवून जिल्हाधिकाºयांनी पत्रकारांसमोर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. जिल्हाधिकाºयांच्या या वर्तणुकीने संतप्त झालेल्या पत्रकारांनी त्यांना शासनाने योग्य समज द्यावी, असे निवेदन दिले होते. त्यानुसार चौकशी अहवालानंतर शासन पुढील दिशानिर्देश देण्याची शक्यता आहे. अहवालात सहा पत्रकार, मोर्णा फाउंडेशनचे तीन पदाधिकारी, घटनेच्या दिवशी उपस्थित असलेले एक एसडीओ, जिल्हाधिकाºयांचे एक स्वीय सहायक अशा अकरा जणांची इनकॅमेरा साक्ष नोंदविली आहे. याशिवाय स्वत: जिल्हाधिकारी यांच्याकडूनही लेखी जबाब घेतला आहे. तो अहवाल सोमवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.