लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संवर्गनिहाय रिक्त जागांची माहिती तयार नसल्याने, विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने बुधवारी जिल्हा परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी -कर्मचार्यांच्या रिक्त जागांची संवर्गनिहाय अभ्यासपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानरपालिका, नगर पालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी -कर्मचार्यांची भरती-बढती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी आणि मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणार्या कल्याणकारी योजनांसंदर्भात आढावा घेण्यासाठी विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती १0 जानेवारीपासून तीन दिवसांच्या अकोला जिल्हा दौर्यावर आली आहे. बुधवार, १0 जानेवारी रोजी दुपारी जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठकीत जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांची भरती-बढती, आरक्षण व रिक्त जागांच्या विषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर, सामान्य प्रशासन विभागांतर्गत रिक्त जागांची विभागनिहाय माहिती देण्यात आली. संवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती सादर करण्यात आली नाही. संवर्गनिहाय अद्ययावत माहिती तयार नसल्याच्या मुद्यावर अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हा परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी व कर्मचार्यांची संवर्गनिहाय अभ्यासपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेण्यात येणार असून, संबंधित मुद्यांची विभागनिहाय माहिती समितीकडून घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती कल्याण समितीप्रमुख आ. हरीश पिंपळे यांच्यासह समिती सदस्य आ. ज्ञानराज चौगुले, आ. गौतम चाबुकस्वार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, समिती अवर सचिव आनंद राहाटे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र जगदाळे व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार आणि संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला भरती-बढती, अनुशेषाचा आढावाविधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आढावा बैठक घेत, जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी व राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजनांच्या कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये कृषी विभाग, जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्ह्यातील नगर पालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सवरेपचार रुग्णालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पुरवठा विभाग इत्यादी विभागांतर्गत भरती, बढती, आरक्षण, अनुशेष संदर्भात आढावा घेण्यात आला. समिती सदस्यांसह जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यासह विविध विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
अध्र्या तासातच संपली बैठक!जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीच्या प्रारंभी सामान्य प्रशासन विभागातील रिक्त पदांची विभागनिहाय माहिती देण्यात आली. संवर्गनिहाय माहिती तयार नसल्याने नाराजी व्यक्त करीत आणि सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले . माहिती तयार नसल्याच्या स्थितीत अध्र्या तासातच आढावा बैठक संपविण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत माहितीवर चर्चा होऊ शकली नाही.
कृषी विद्यापीठ सकारात्मक काम करेल; समितीचा आशावाद!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांची भरती, पदोन्नती, आरक्षण, अनुशेष व इतर विषयांचा आढावा घेत, कृषी विद्यापीठ भविष्यात मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर सकारात्मक काम करेल, असा आशावाद अनुसूचित जाती कल्याण समितीप्रमुख आ. हरीश पिंपळे यांच्यासह समिती सदस्यांनी व्यक्त केला. यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले व संबंधित अधिकारी उपस्थित होते. कृषी विद्यापीठात आयोजित बैठकीतच समितीने महावितरण कंपनी अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांची भरती -बढती, आरक्षण आणि विविध योजनांच्या कामांचा आढावा घेतला.