लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनपा प्रशासनाच्या मदतीने सत्ताधारी भाजपाने अकोलेकरांवर लादलेल्या करवाढीच्या संदर्भात विशेष सभा आयोजित करण्याची मागणी लावून धरत विरोधी पक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी दुपारी दोन वाजता महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. रात्री साडेनऊ वाजता सिटी कोतवाली पोलिसांनी काँग्रेस-सेनेच्या नगरसेवकांना ताब्यात घेतले असता, नगरसेवकांनी मनपा कार्यालयापासून ते सिटी कोतवालीपर्यंत पायी चालणे पसंत केले. पायी चालणारे नगरसेवक व त्यांना गराडा घालणारे पोलीस असे चित्र अकोलेकरांनी अनुभवले. मनपातील सत्ताधारी पक्ष भाजपा व प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर अकोलेकरांवर सुधारित करवाढ लागू केली. अव्वाच्या सव्वा करवाढ लागू केल्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी या मुद्यावर महापौर विजय अग्रवाल यांनी विशेष सभा आयोजित करण्याची मागणी लावून धरली होती. सुमारे दीड महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेता साजीद खान, डॉ.जिशान हुसेन, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी विशेष सभा घेण्यासाठी महापौरांना नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले होते. आजपर्यंतही यासंदर्भात महापौरांनी भूमिका स्पष्ट न केल्यामुळे बुधवारी दुपारी दोन वाजता काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन व शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते. रात्री साडेनऊ वाजता सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, इरफान खान, मोहम्मद नौशाद, फिरोज खान, नगरसेविका विभा राऊत, शाहीन अंजूम मेहबुब खान, अजरा नसरीन मकसूद खान, नगरसेविका पती रवि शिंदे, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशीकांत चोपडे, नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सपना नवले यांना महापौरांच्या दालनातून ताब्यात घेतले.
राष्ट्रवादी, भारिपची पाठ!करवाढीमुळे सर्वसामान्य अकोलेकर होरपळला जात असल्याच्या मुद्यावर काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादी व भारिपच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन दीड महिन्यांपूर्वी विशेष सभेची मागणी केली होती. बुधवारी महापौरांच्या दालनात काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन छेडले असता, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.
आयुक्त म्हणाले, माझ्या दालनात चला!विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नगरसेवकांची भेट घेतली. माझ्या दालनात चला, आपण चहा घेऊन सविस्तर चर्चा करू, असा प्रस्ताव आयुक्तांनी समोर केला असता, नगरसेवकांनी तेवढ्याच नम्रतेने आयुक्तांना नकार दिला.
नगरसचिवांनी केली तक्रार पण...प्रशासनाच्यावतीने नगरसचिव बिडवे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नगरसेवकांविरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. परंतु, आमचा कोणताही गुन्हा नसताना ताब्यात घेतले कसे, असा सवाल उपस्थित करीत काँग्रेस, सेनेच्या नगरसेवकांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच थांबणे पसंत केले.