आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधून आठ सदस्य पायउतार झाल्यानंतर बुधवारी मनपात नव्याने आठ सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ‘स्थायी’मध्ये जाण्यासाठी शिवसेनेत जोरदार घमासान रंगले असून, लोकशाही आघाडीमुळे राष्ट्रवादीत रस्सीखेच रंगली आहे. मनपातील सत्ताधारी पक्ष भाजप व विरोधी पक्ष काँग्रेसमधील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी केली असली, तरी सदस्य निवडीवर दोन्ही पक्ष बुधवारी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. मनपाच्या स्थायी समितीचे गठन करण्यासाठी गतवर्षी १६ सदस्यांची निवड करण्यात आली होती. एकूण ८0 नगरसेवकांपैकी सत्ताधारी भाजपाचे ४८ नगरसेवक असल्यामुळे निकषानुसार भाजपमधून दहा नगरसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यापाठोपाठ काँग्रेस, शिवसेनेतून प्रत्येकी दोन, तसेच राष्ट्रवादीच्या लोकशाही आघाडीतून दोन अशाप्रकारे सोळा सदस्यांची निवड झाली होती. महाराष्ट्र महापालिका अधिनियमनुसार स्थायीला एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ईश्वर चिठ्ठीद्वारे आठ सदस्यांचा कालावधी संपुष्टात येतो. त्यासाठी नव्याने आठ सदस्यांची निवड करावी लागते. येत्या २८ फेब्रुवारी रोजी मनपात स्थायी समितीसाठी आठ सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पृष्ठभूमिवर सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपचा निर्णय बुधवारी!अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी अक ोल्यात उपलब्ध नाहीत. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांची संख्या व इच्छुकांची मोर्चेबांधणी पाहता २८ फेब्रुवारी रोजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत निर्णय होण्याची शक्यता आहे. आठ सदस्यांची निवड होताच स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड होईल. त्यासाठी पूर्व विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
आघाडीमुळे राष्ट्रवादीत रस्सीखेचराष्ट्रवादीने भारिप-बमसंच्या तीन व एमआयएमच्या एका नगरसेवकाला सोबत घेत लोकशाही आघाडीचे गठन केले आहे. एमआयएमचे मोहम्मद मुस्तफा व राष्ट्रवादीचे फैयाज खान यांना संधी देण्यात आली होती. फैयाज खान नवृत्त झाल्यानंतर आता भारिप-बमसंच्या नगरसेवकाची वर्णी लागते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेळप्रसंगी राकाँच्या गटनेत्या शीतल गायकवाड किंवा अजय रामटेके यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. उद्या यामुद्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेत घमासान; दबाव तंत्राचा वापरमनपात शिवसेनेचे आठ नगरसेवक आहेत. ‘स्थायी’साठी पहिल्या वर्षी सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, सपना नवले यांची वर्णी लागली होती. ईश्वर चिठ्ठी काढली असता, राजेश मिश्रा नवृत्त झाले. त्यामुळे स्थायीमध्ये एका सदस्याची निवड केली जाईल. एका जागेसाठी सेनेत जोरदार घमासान रंगले आहे. काही नगरसेवकांमार्फत दबाव तंत्राचा वापर केला जात असल्यामुळे पक्षात तीव्र नाराजी पसरली आहे. हा प्रकार पाहता स्थायी समितीमध्ये प्रत्येक नगरसेवकाला एका वर्षाची संधी देण्यावर पक्षात खलबते सुरू झाली आहेत. वेळप्रसंगी सपना नवले यांच्या जागेवर इतर नगरसेवकाची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. तूर्तास नगरसेविका मंजूषा शेळके यांचे पारडे जड मानल्या जात आहे.