लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. वैशाली कोरडे हिने याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारिके सोबत वाद घालून तिला अश्लील शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी समोर आली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. वैशाली कोरडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय परिसरात डॉक्टर वैशाली कोरडे त्यांची कार भरधाव वेगात चालवित असताना या कारने अधिपरिचारिका जयश्री गोपाल लाखे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात जखश्री लाखे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचे पती गोपाल लाखे यांनी डॉ. कोरडे हिला विचारणा केली असता डॉक्टरने लाखे दाम्पत्याला शिवीगाळ केली, त्यानंतर डॉ. वैशाली कोरडे हिने अधिपरिचारिका लाखे या ड्युटीवर हजर असताना त्यांच्यासोबत उर्मटपणे संवाद साधला. या प्रकरणाची तक्रार वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे केली असता अधिष्ठाता यांनी कशाचाही विचार न करता डॉक्टरविरुद्ध तक्रार देणाºया अधिपरिचारिकेवर सूड भावनेने कारवाई करीत त्यांना नोटीस बजावली. एवढेच नव्हे, तर शासकीय निवासस्थान खाली करण्याचे आदेश दिले. या आंदोलनातच दोषी नसलेल्या अधिपरिचारिका यांच्यावर कारवाई केल्याने अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, जयश्री लाखे यांच्या तक्रारीवरून मुजोर डॉक्टरविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, २७४, ५०४, ५०६, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टरांचा मनमानी कारभार वाढला!शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा मनमानी कारभार वाढला आहे. रुग्णांसोबत वाद घालत हाणामारी करण्यापासून तर त्यांच्या नातेवाइकांना शिवीगाळ केल्या जात आहे. स्वत:चे हे प्रताप पांघरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने स्वत:ची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली; मात्र आता डॉक्टर व अधिपरिचारिका वाद सुरू झाले आहेत.
अधिपरिचारिकांनी नोंदविला निषेधशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अधिपरिचारीका जयश्री लाखे यांना डॉ. वैशाली कोरडे यांनी शिवीगाळ केल्याच्या प्रकाराचा तसेच, या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना मेट्रन यांना नोटीस बजावणाºया महाविद्यालय प्रशासनाचा रुग्णालयात कार्यरत अधिपरिचारिकांनी शनिवारी निषेध केला. अधिष्ठातांनी सुडभावनेने ही कारवाई केल्याचा निषेध करीत अधिपरिचारिकांनी शनिवारी काळ्या फिती बांधून काम केले.