लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मालमत्ता कराच्या रकमेत वाढ केल्यानंतर नागरिकांनी घेतलेल्या आक्षेप-हरकतींचा निपटारा न करता मालमत्ताधारकांना ताटकळत ठेवण्याच्या वादाने मंगळवारी परिसीमा गाठली. महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या दालनात सहायक कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे व उपस्थित पदाधिकारी, नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीकबाचाबाची झाली. आयुक्तांच्या दालनाबाहेर निघा, तुम्हाला दाखवतो, असे नंदकिशोर उजवणे यांनी म्हणताच उपस्थित नगरसेविका पुत्र सागर शेगोकार यांनी उजवणे यांच्या कानशिलात लगावली. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत सहायक कर अधीक्षक उजवणे यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेत प्रशासनाने वाढ केली. मागील १८ वर्षांपासून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न झाल्यामुळे अक ोलेकरांवर कधीही निकषानुसार कर आकारणी झाली नाही. परिणामी मनपाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने पुनर्मूल्यांकन करीत सुधारित करवाढ लागू केली. इमारतीच्या चटई क्षेत्रफळानुसार कर आकारणी झाल्यामुळे कराच्या रकमेत वाढ झाली. त्यावर नागरिकांना आक्षेप-हरकती घेण्याची मुभा असली, तरी अपील दाखल करण्यापूर्वी थकीत रकमेचा भरणा करणे क्रमप्राप्त आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी आक्षेप-हरकतींवर सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढण्याचे अधिकार कर अधीक्षक व सहायक कर अधीक्षकांना दिले आहेत. पूर्व झोनमधील सहायक कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे त्यांच्याकडे दाखल असणाºया आक्षेप-हरकतींच्या फाइलचा तातडीने निपटारा करीत नसल्याच्या तक्रारी काही मालमत्ताधारकांनी महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे केल्या. त्यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी महापौर विजय अग्रवाल यांनी नंदकिशोर उजवणे यांना विचारणा केली असता, उजवणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती आहे. या मुद्यावरून महापौरांनी उजवणे यांना कानपिचक्या दिल्या असता त्यांनी थेट आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या दालनात धाव घेतली.
आयुक्तांच्या दालनात बाचाबाचीसहायक कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे आयुक्तांच्या दालनात पोहोचल्याची माहिती मिळताच महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, मा. सभापती विलास शेळके, मा. नगरसेवक सागर शेगोकार, जयंत मसने यांच्यासह इतरही नगरसेवकांनी धाव घेतली. महापौर विजय अग्रवाल यांनी ज्या फाइलच्या संदर्भात उजवणे यांना विचारणा केली होती, ती फाइल उजवणे यांनी आयुक्तांकडे सादर केली. त्या मुद्यावर महापौर अग्रवाल आयुक्तांसोबत चर्चा करीत असताना नंदकिशोर उजवणे यांनी अग्रवाल यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. या विषयावरून उजवणे व नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली.
अन् नगरसेविका पुत्राने लगावली कानशिलातमहापौर अग्रवाल व आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या चर्चेत हस्तक्षेप करणाºया उजवणे यांच्यासोबत उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये शाब्दीक बाचाबाची सुुरू झाली. वाद वाढत जाऊन उजवणे यांच्या ‘बाहेर निघा, तुम्हाला दाखवतो’ या वाक्यावर संतापलेले नगरसेविका पुत्र सागर शेगोकार यांनी उजवणे यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे.
उजवणे यांनी दिला राजीनामामनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कर अधीक्षक विजय पारतवार यांच्यामार्फत प्रकरणाची शहानिशा केली असता, सहायक कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे यांनी काही मालमत्ताधारकांच्या फाइल ताटकळत ठेवल्याचे समोर आले. या प्रकरणी आयुक्त कारवाई करणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर उजवणे यांनी रात्री मनपा आयुक्तांकडे सेवेचा राजीनामा सादर केला.
नागरिकांनी नोंदवलेले आक्षेप-हरकती निकाली न काढता त्या जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याकडे उजवणे यांचा कल दिसून आला. त्यासंदर्भात विचारणा केली असता, उजवणे यांनी उपायुक्त दीपक पाटील यांच्याकडे बोट दाखवले. उजवणे यांची भूमिका संशयास्पद असून, प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. -विजय अग्रवाल, महापौरकंपनीने सादर केलेल्या हरकती, आक्षेपांच्या फाइलवर उपायुक्तांच्या स्वाक्षरी आहेत. उपायुक्तांच्या फाइलवर मी स्वाक्षरी करणे अपेक्षित नाही. माझे पदनाम असेल तरच स्वाक्षरी करता येते. यासंदर्भात कर अधीक्षकांना माहिती दिली होती. त्यामुळे काही फाइल प्रलंबित राहिल्या. मालमत्तांना सील केल्यामुळे दुखावलेल्या काही मालमत्ताधारकांनी मनपात तक्रारी केल्या. -नंदकिशोर उजवणे, सहायक कर अधीक्षक मनपा