लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अतिक्रमण विभागातील गलथान कारभाराला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले जबाबदार असून, त्यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे ताशेरे या विभागात कार्यरत कर्मचार्यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात ओढले आहेत. मनपातील एक वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख इंगोले यांच्यामुळे मानसेवी कर्मचार्यांचे मनोबल ढासळत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय. शहरात अतिक्रमणाच्या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिकांना वैताग आला असून, रस्त्यावरून धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाची समस्या दूर करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची असली तरी मनपातील काही वरिष्ठ अधिकार्यांनी साधलेल्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे हा विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण विभागात अंदाधुंद कारभार माजला असून, अतिक्रमकांजवळून खुलेआम हप्तेखोरी केली जात असल्याची माहिती आहे. या विभागाच्या हप्तेखोरीमुळे अतिक्रमकांचे मनोबल उंचावले असून, मनपाच्या आवारभिंतीलगत व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते असो वा प्रभागातील अंतर्गत अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी निश्चित करतात. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अतिक्रमण विभागाचे आहे. मागील काही दिवसांपासून अतिक्रमण विभागाला वारंवार सूचना केल्यावरही कारवाई होत नसल्याचा आरोप खुद्द नगरसेवकांकडूनच केला जात आहे. नगरसेवकांच्या भावना व अतिक्रमण विभागाची मुजोरी ध्यानात घेता स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी ३0 जानेवारी रोजीच्या सभेत अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले होते. तसेच विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांच्यासह सर्व कर्मचार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याचे बजावले होते. याप्रकरणी अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात या विभागाचा गलथान कारभार व वाढलेल्या अतिक्रमणाला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांच्या कामकाजावर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहेत.
वरिष्ठ अधिकार्याकडून पाठराखण का?अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर थेट मनपा उपायुक्त (विकास) यांचे नियंत्रण राहते. आजरोजी अतिक्रमण विभागाने मनमानी कारभाराचा कळस गाठल्यामुळे शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी अतिक्रमण निर्माण झाले आहे. या विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्याची जबाबदारी असणार्या मनपातील एका वरिष्ठ अधिकार्याकडूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती आहे.
मानसेवी कर्मचार्यांना सोबत घेऊन अतिक्रमण हटविणे अपेक्षित असताना विभाग प्रमुख एकटेच मोहिमेवर निघतात. विभाग प्रमुखांच्या भूमिकेमुळे या विभागातील कर्मचार्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. कर्मचार्यांनी दिलेल्या पत्रात या सर्व बाबी नमूद केल्या आहेत. - बाळ टाले,सभापती, स्थायी समिती, मनपा