अकोला : तंबाखू, पान, गुटखा खाण्याच्या निमित्ताने लोक पानठेले तसेच दुकानांवर गर्दी करतात. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी थुंकतात, धूम्रपान करतात. त्यामुळे या माध्यमातून होणारा संभाव्य कोरोनाचा प्रसारही टाळता यावा याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिले. तसेच जिल्ह्यातील सर्वच पानठेले ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांचा दुसऱ्या दिवशी आढावा घेतला असता शहरासह ग्रामीण भागातील पानठेले सर्रासपणे सुरूच असल्याचे आढळले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्हा परिषद कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेले पानठेलेही बेधडक सुरूच होते.आगामी १५ दिवस कोरोनाचे जास्त संकट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकल्यास त्यावर साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिला. हा आदेश शहरी भागात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात तहसीलदार व अन्य यंत्रणांना दिला. यासोबतच जिल्ह्यातील सर्वच पानठेले बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५)च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्याचा इशारादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता; मात्र हा इशारा पानठेला व्यावसायिकांनी जुमानला नसल्याचे दिसून आले.