अकोला : मनात इच्छाशक्ती असल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अकोला जिल्हयाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आपल्या व्यस्त कामातून बंगल्याच्या परिसरात उत्तम शेती करुन शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बंगल्याच्या परिसरातील दहा एकर क्षेत्रात विविध पिकांसह भाजीपाला व फळांची शेती त्यांनी पिकवली आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जाणारे आस्तिक कुमार पाण्डेय यांनी वर्षभरापूर्वी अकोला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला. अल्पावधीत आपल्या कामाची चुणूक दाखवत त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली. अकोल्याचे वैभव असलेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. या उपक्रमाची स्वत: पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढत जिल्हाधिकाºयांनी आपल्या ‘प्रस्थल’ या बंगल्याचा परिसर हिरवागार केला आहे. बंगल्याच्या परिसरातील दहा एकर जमिनीवर त्यांनी शेतीचे विविध प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे सेंद्रीय शेतीवर त्यांनी भर दिला आहे. नुकतेच त्यांनी अर्धा एकर शेतीतून सुमारे सात क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतले. त्यापूर्वी दोन-दोन क्विंटल उडीद आणि मुगाचे उत्पादन काढले.याशिवाय शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवलेला दिसून येईल. वांगी, पालक, कोबी, कोथिंबीर, शेवगा या भाजीपाल्यांसह पपई, डाळींब, केळी यांचीही लागवड केल्याचे दिसून येते. सोबतच जनावरांचा चाराही त्यांनी भरघोस प्रमाणात पिकवला आहे. भविष्यात बंगल्याच्या पसिरातील शेतीच्या माध्यमातून अनेक नाविण्यपूर्ण प्रयोगशील उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. यासोबतच कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधमाशापालन करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे. शेतात पिकवण्यात आलेली फळे अनाथश्रमाला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात जिल्हाधिकारी यांचे वडिल हृदयराम पाण्डेय यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे.