अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७५५.३२ कोटी रुपयांच्या खर्चातून अकोला जिल्ह्यातील २५० किलोमीटर अंतराचे पाच मार्ग बांधले जाणार आहेत. हायब्रिड अॅन्युईटी अंतर्गत बांधल्या जाणारे परिसरातील जवळच्या राष्ट्रीय आणि राज्य मार्गांना जोडले जात आहे. या मार्ग निर्मितीचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी वाडेगाव येथे ठेवण्यात आला असून, या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रणजित पाटील, उद्योगमंत्री प्रवीण पोटे व खासदार संजय धोत्रे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.शेगाव ते पंढरपूर पालखी मार्ग ८२ किलोमीटर, कापशी ते बार्शीटाकळी-कारंजा मार्ग ४८ किलोमीटर, वरवट बकाल-वणी वारुळा मार्ग ४१ किलोमीटर, हिवरखेड-तेल्हारा-आडसूळ मार्ग ३५ किलोमीटर आणि अकोला म्हैसांग-दर्यापूर मार्ग ४३ किलोमीटर बांधला जाणार आहे. एकूण २५० किलोमीटर अंतराच्या या मार्गांवर ७५५.३२ कोटींचा खर्च होणार आहे. हे पाचही मार्ग जवळच्या राष्ट्रीय आणि राज्य मार्गांना जोडल्या जात असल्याने भविष्यात या मार्गांचा उपयोग मोठ्या प्रमाणासाठी ‘शार्टकट’साठी होणार आहे, अशी माहितीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.६० टक्के शासन खर्चातून निर्मितीअकोला जिल्ह्यातील हायब्रिड अॅन्युईटी अंतर्गत होणाऱ्या पाच मार्ग निर्मितीचा खर्च सध्यातरी केवळ ६० टक्के आहे. महाराष्ट्र शासन ६० टक्के खर्च कंत्राटदारास देईल. उर्वरित ४० टक्के खर्च कंत्राटदारास करायचा आहे. त्याला आरबीआयच्या नियमावलीनुसार कर्जही देता येईल. सोबतच या रकमेवर तीन टक्के व्याज शासन देणार आहे. टप्प्या-टप्प्याने कंत्राटदारास ही रक्कम मिळणार आहे. यासाठी कंत्राटदारास १० वर्षांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारावी लागणार आहे.