अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांसाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातील मिळून २९ बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्या उपस्थितीत कर्मचाºयांच्या बदलीच्या ठिकाणावर नियुक्ती आदेश देण्यात आले.जिल्हा स्तरावर बदल्या करण्यासाठी प्रशासनाने ११ ते १५ मे या दरम्यान नियोजनाचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार मंगळवारी अखेरच्या दिवशी सामान्य प्रशासन विभाग आणि शिक्षण विभागातील बदली पात्र कर्मचाºयांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागातील विस्तार अधिकारी सांख्यिकी-१, वरिष्ठ सहायक-२, कनिष्ठ सहायक-१२, वाहनचालक-२, परिचर-७, सफाई कामगार-१ अशा २५ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या. तर शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख-३, विस्तार अधिकारी-१ अशा चार बदल्या झाल्या आहेत. यापूर्वी बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन, आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. आता तालुका स्तरावरील बदल्या १६ ते २५ मे या कालावधीत केल्या जाणार आहेत.