अकोला : जिल्हा परिषदेत आधीच शिक्षक अतिरिक्त असताना आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. त्यामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांच्या कार्यकाळातील शिक्षकांची संख्या मोठी आहे, त्या पदाचा प्रभार डॉ. सुभाष पवार यांच्याकडे असताना झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांची संपूर्ण माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी शिक्षण विभागाकडे मागवली आहे. त्यामुळे अधिकारी-पदाधिकाºयांमध्ये आता चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांमुळे बिंदुनामावलीचा मोठा घोळ झाला होता. त्या घोळाची चौकशी अमरावती विभागाचे उपायुक्त (विकास) यांच्या पथकाने केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या ७४ शिक्षकांचे केवळ आदेश उपलब्ध आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत पदस्थापना देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात फाइल कोणी तयार केली. त्या फाइलला कोणी मंजुरी दिली. त्यानुसार शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठीचे आदेश कोणी दिले. फाइल सुरू होण्यापासून शेवटपर्यंतचा प्रवास, याबाबतचा कुठलाच कागद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याचे पुढे आले. हा प्रकार थेट मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातून झाला. त्यामुळे शिक्षण विभागातील संबंधितांकडे आंतरजिल्हा बदली आदेशाची माहिती उपलब्ध नसल्याने काही कर्मचाºयांनाही नोटीस बजावण्यात आल्या. आता त्या आंतरजिल्हा बदली प्रकरणात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना डॉ. पवार यांच्या कार्यकाळात झालेल्या बदल्यांची माहिती अध्यक्षांनी मागवली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील अधिकारी-पदाधिकारी वॉर रंगण्याची चिन्हे आहेत.
अतिरिक्त असताना शिक्षकांना कसे रुजू करून घेतले...इतर जिल्हा परिषदेतून आलेले शिक्षक रुजू झाल्यानंतर त्यांच्या फाइल जतन करण्याची जबाबदारी अकोला जिल्हा परिषदेची आहे; मात्र त्या फाइल शिक्षकांनी परस्पर चालवल्या. त्या माध्यमातूनच त्यांनी पदस्थापना मिळवली. हा प्रकार कसा झाला, याच्या मुळाशी आता पदाधिकारी जाणार आहेत.