अकोला : अत्यल्प पाऊस आणि प्रचंड घटलेले उत्पादन यामुळे जिल्ह्यातील शेतक री मेटाकुटीस आला असून, अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा तसेच एकरी अनुदान देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह हजारो शेतकर्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.छावा संघटना व हजारो शेतकर्यांनी वसंत देसाई क्रीडांगणावरून भव्य मोर्चा काढला. मध्यवर्ती बसस्थानक चौक, खुले नाट्यगृहासमोरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्याकडील पशुधन कमी किमतीत विक्रीला काढत आहेत. तसे न केल्यास पुढील सहा महिने त्यांच्यापुढे काय मांडावे आणि आपली गुजराण कशी करावी, अशी चिंता शेतकर्यांना आहे. शेतकरी अशाप्रकारे प्रचंड मानसिक, आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना सरकार मात्र मदतीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना तातडीने मदत करण्यात यावी, नरेगा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पाणंद व शेतरस्त्यांचा कृती आराखडा तयार करून धडक योजनेंतर्गत अंमलबजावणी करावी, शेतकर्यांचे पीक कर्ज माफ करावे, सर्व शेतकर्यांना हेक्टरी ३0 हजार रुपये मदत जाहीर करावी, पुढील हंगामासाठी शेतकर्यांना बी-बियाणे मोफत उपलब्ध करावे, पिकांचा विमा शासनानेच काढावा, सिंचन व रस्त्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, जिल्ह्यातील आमदार व खासदारांचा निधी जलव्यवस्थापनाकरिता देण्यात यावा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटना व हजारो शेतकर्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे या मागण्या करण्यात आल्या आहेत.
अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
By admin | Published: December 06, 2014 12:56 AM