लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील विविध विकास कामांसह समस्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या विधान भवनात आयोजित बैठकीत घेणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित अधिकारी सोमवारी सायंकाळी नागपूरकडे रवाना झाले. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार्या विविध योजनांची अंमलबजावणी, विकास कामांची सद्यस्थिती आणि विविध समस्या व अडचणींच्या मुद्यांवर मुख्यमंत्री जिल्हानिहाय आढावा बैठका घेणार आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील विकास कामे, योजनांची अंमलबजावणी आणि समस्यांबाबत आढावा बैठक १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री घेणार आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकार्यांसह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व संबंधित अधिकारी सोमवारी सायंकाळी नागपूरकडे रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून ‘या’ मुद्यांचा घेण्यात येणार आढावा! विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात गतवर्षी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतील निर्णयाच्या इतवृत्तांची अंमलबजावणी, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत कामांचे उद्दिष्ट व साध्य, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील विकास कामांची सद्यस्थिती, कर्जमाफी योजनेंतर्गत कामाची प्रत्यक्ष स्थिती, महामार्ग रस्त्यांची स्थिती व दुरुस्ती आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची स्थिती व दुरुस्तीची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामांची सद्यस्थिती, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प आणि प्रस्तावित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपांसाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करणे, शेतकरी आत्महत्या प्रकरणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कामांची सद्यस्थिती, विशेष प्रकल्पांतर्गत कामे इत्यादी मुद्यांसह विविध समस्या आणि अडचणींचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.