संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरिबांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.बाजार हस्तक्षेप योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये प्रतिकिलो दराने तूर डाळ वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत ५00 क्विंटल तूर डाळीची मागणी करण्यात आली. त्यापैकी ८ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील अकोला, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांसाठी ३५0 क्विंटल तूर डाळ महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनद्वारे जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांमार्फत प्राप्त झाली. जिल्हा पुरवठा विभागामार्फत चारही तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून उपलब्ध तूर डाळीचे वाटप शिधापत्रिकाधारकांना सुरू करण्यात आले. रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने वाटप करण्यात येत असलेल्या या तूर डाळीमध्ये पांढरी टरफले आहेत, तसेच बारीक दाणे असलेली ही डाळ शिजण्यासही विलंब लागतो. त्यामुळे बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत रास्त भाव दुकानांमधून निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.
शासनाकडून प्राप्त तूर डाळीचे वाटप ५५ रुपये किलो दराने रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत आहे; परंतु बारीक असलेल्या या तूर डाळीमध्ये पांढरी टरफले असून, ही डाळ शिजण्यास विलंब लागतो. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच ही तूर डाळ वाटप करण्यासाठी रास्त भाव दुकानांना दिली पाहिजे.-शत्रुघ्न मुंडे,अध्यक्ष, जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना
बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हय़ातील चार तालुक्यांतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांमार्फत आतापर्यंत ३५0 क्विंटल तूर डाळ प्राप्त झाली आहे. उपलब्ध तूर डाळीचे वाटप रस्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारक लाभार्थींना करण्यात येत आहे.डाळ निकृष्ट असल्याबाबत तक्रार प्राप्त नाही.तक्र ार आल्यास चौकशी करू-संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी