आगर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून उगवा येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली. सदानंद ऊर्फ बाळू अमृता सिरसाट असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.सदानंद सिरसाट यांच्याकडे कोरडवाहूची पाच एकर शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून या शेतीतून अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज काढले होते. हे कर्ज २०१५ पासून थकीत होते. तसेच काही कामांसाठी त्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवलेले आहेत. यावर्षी चांगले उत्पादन होईल, अशी त्यांना अपेक्षा होती; मात्र यावर्षीही चांगले उत्पादन झाले नाही. कपाशीवर बोंडअळी आल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत होते. या विवंचनेतच ते २९ डिसेंबर रोजी घरातून बाहेर गेले होते. रात्री परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र ते सापडले नाही. ३० डिसेंबर रोजी सकाळी काही मजुरांना गावाच्या पूर्वेस असलेल्या एका शेतात ते मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय राऊत व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. सिरसाट यांच्या मागे पत्नी व तीन मुले आहेत. (वार्ताहर)