अकोला : संपूर्ण जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील गरोदर महिलांसाठी आधारवड ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात एकाच दिवशी दोन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही बालकं पाच ते सहा दिवसांची असून, गुरुवारी पहाटे फिजिओलॉजिकल जाँडीसमुळे (एक प्रकारचा कावीळ) त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.‘लेडी हार्डिंग’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अकोला जिल्ह्यासह लगतच्या बुलडाणा, वाशिम, अमरावती जिल्ह्यांमधून गरोदर महिला प्रसूतीसाठी येतात. ३०० खाटांच्या रुग्णालयात दररोज साधारणत: ४० ते ५० प्रसूती होतात. मुळात ‘रेफरल हॉस्पिटल’ असल्यामुळे या ठिकाणी जोखमीच्या प्रसूती असलेल्या महिलांची संख्या अधिक असते. त्यामुळे येथे अत्याधुनिक व तातडीने मिळणारी सुविधा अपेक्षित आहे. परंतु, अनेकदा रुग्णालय ही सुविधा पुरविण्यास कमी पडत असल्याच्या तक्रारी आहेत. या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या दर्यापूर तालुक्यातील शारदा कडू व पुणे जिल्ह्यातील आकुर्डी सासर असलेली सीमा परविन सिद्धीकी या महिलांची सिझेरियन डिलेव्हरी पाच ते सहा दिवसांपूर्वी झाली. या दोन्ही मातांच्या नवजात बाळांना फिजिओलॉजीकल जाँडीस असल्यामुळे त्यांना फोटोथेरपी दिल्या जात होती. दोन्ही बालकांना ठरावीक अंतराने हे इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात येत होते. दरम्यान, गुरुवारी पहाटे ही दोन्ही बालके त्यांच्या आईजवळ असताना दगावली. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बालकांचा अचानक मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर मात्र नातेवाईकांनी नमते घेतल्यामुळे परिस्थिती निवळली. रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बालकांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्याचीही तयारी दर्शविली; परंतु नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले.दोन्ही बाळांना सौम्य प्रकारचा कावीळ होता. त्यामुळे त्यांना फोटोथेरपी सुरू होती. दोन्ही बालकांना ठरावीक अंतराने हे इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात येत होते. गुरुवारी पहाटे या दोन्ही बालकांचा अचानक मृत्यू झाला. यासंदर्भात नातेवाईकांनी कोणतीही तक्रार केली नाही.
- डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षिक, जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला.