अकोला : शैक्षणिक सत्र २०-२१ करिता करण्यात आलेल्या स्काऊट गाइड युनिट नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, आतापर्यंत जिल्ह्यात ८५२ युनिटची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये स्काऊटच्या ३३१, गाइडच्या १८८, कबच्या १७५, बुलबुलच्या १५७ व रोव्हरच्या एका युनिटचा समावेश आहे. युनिट नोंदणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही अकोला जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा युनिटच्या संख्येत ३०८ युनिटची वाढ झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात एकूण ५४४ युनिटची नोंदणी झाली होती.
अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी स्काऊट गाइड, कब बुलबुल युनिटची नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. वैशाली ठग यांनी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांच्या ऑनलाइन सभेत केले होते. त्यांच्या संकल्पनेतून ‘शाळा तिथे स्काऊट गाइड, कब बुलबुल युनिट’ स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात दि. २१ ते २९ जानेवारी कालावधीत तालुकानिहाय युनिट नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. तालुकास्तरीय युनिट नोंदणी अभियानामध्ये जिल्हा परिषदेच्या ४७९ शाळांमध्ये प्रथमच सर्वाधिक नोंदणी करण्यात आली, हे विशेष. युनिट नोंदणी अभियानाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक देवेंद्र अवचार, अकोला जिल्ह्यातील विविध पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, श्याम राऊत, गौतम बडवे, संजय मोरे, दिनेश दुतंडे, हाडोळे, अनिल अकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी अजयकुमार बांडी, दीपमाला भटकर, गजानन सावरकर, समाधान जाधव, जिल्हा संघटक सोनिया सिरसाट, लीडर ट्रेनर डॉ. वसंतराव काळे यांच्यासह अकोला जिल्ह्यातील विविध केंद्रांच्या केंद्रप्रमुखांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. युनिट नोंदणी अभियानात तालुका प्रतिनिधी म्हणून श्रीकृष्ण डांबलकर लीडर ट्रेनर, शरदचंद्र मेहेकरे लीडर ट्रेनर, के.टी. मानखैर, पी.जे. राठोड, राजेश पातळे, सुषमा देशमुख, दत्तात्रय सोनोने, संदीप वाघडकर, मनोज बगले, विजय जितकर, बबलू तायडे, डॉ. राजेश्वर बुंदेले, मेघा निबंधे, नामदेव जाधव आदींनी जबाबदारी पार पाडली. कार्यालयीन कर्मचारी रमेश चव्हाण व सुबोध शेगावकर यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.