रवी दामोदर, अकोला : जिल्ह्यातील ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये कमी दराने ज्वारीची विक्री करण्याची वेळ आली होती. याची दखल घेत शासनाने अकोला जिल्ह्याला २८,५०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळाले असून, शेतकऱ्यांना खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी २० जूनपर्यंत करता येणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी ६ हजार २४३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जिल्ह्याची ज्वारी उत्पादकता सरासरी हेक्टरी २० क्विंटल एवढी आहे. यामुळे जिल्ह्यात १ लाख २४ हजार ८७० क्विंटल ज्वारीचे उत्पादन झाले आहे. परंतु, शासनाने अकाेला जिल्ह्याला केवळ १५ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिले हाेते. ते उद्दिष्ट दहा दिवसांतच पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांकडे सध्या १ लाख १० हजार क्विंटलवर ज्वारी शेतकऱ्यांकडे आहे. यामुळे शासनाने ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशा आशयाचे पत्र नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला पाठविण्या आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला २५,८०० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळाल्याची माहिती आहे.२० जूनपर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी
जिल्ह्यात सात खरेदी केंद्रांवर शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार भरडधान्य ज्वारीची नोंदणीकरीता शेतकऱ्यांना आता मुदतवाढ मिळाली आहे. आता शेतकऱ्यांना दि. २० जून पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, यापूर्वीसुद्धा मुदतवाढ मिळाली होती, परंतू नोंदणी पाहता खरेदीकरिता पुरेशी नोंदणी झाली नसल्याचे चित्र दिसून आले.ज्वारीचे हमीदर ३,१८० रुपये
सध्या शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करायची आहेत. प्रतिक्विंटल ज्वारीला ३१८० रुपये असे बऱ्यापैकी हमीदर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना सरासरी २,१५० प्रतिक्विंटलप्रमाणे ज्वारी विक्री करण्याची वेळ आली होती.