- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित कामे करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे निम्म्यावरच थांबल्याचे वास्तव समोर आले आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, अकोला जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले कोरडी पडले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ५४४ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी आहेत. पावसाळा सुरू झाल्याने, उर्वरित पाणीटंचाई निवारणाची कामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कृती आराखड्यात प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाची जिल्ह्यातील कामे निम्म्यावरच थांबल्याचे चित्र आहे.५८७ कामांना प्रशासकीय मान्यता!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांमार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ५८७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ४७ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी आहेत.