- नितीन गव्हाळेअकोला: इयत्ता दहावीची परीक्षा आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात किती टक्के, गुण मिळतील, निकाल चांगला लागला नाही तर पालकांचा रोष ओढावेल, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते; परंतु विद्यार्थ्यांची ही चिंता कलमापन चाचणीमुळे दूर झाली आहे. कलमापन चाचणीच्या निकालामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षेत किती गुण मिळतील, याचा अंदाजच विद्यार्थ्यांना आला आहे. कलमापन चाचणीमध्ये जिल्ह्याचा एकूण निकाल ८७ टक्के लागला असून, यात अकोट व तेल्हारा तालुका निकालात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा झाल्यावर दोन महिने उन्हाळ्याची सुटी विद्यार्थ्यांना मिळते. त्यानंतर दहावीचा निकाल लागतो. परीक्षा झाल्यावर दहावी परीक्षेत किती गुण, टक्के मिळतील, अशी विद्यार्थ्यांना चिंता सतावते. चांगले गुण मिळाल्यावर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, याचा अंदाज विद्यार्थ्यांसोबत पालकसुद्धा काढतात. यंदा राज्य शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, व्यावसायिक मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आणि श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने दहावी परीक्षेपूर्वी जिल्ह्यातील ३१ हजार १४७ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ८0 विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेतली होती. या कलमापन चाचणीचा १६ मार्च रोजी निकाल जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ८७ टक्के लागला आहे. यामध्ये अकोट तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८९.१ टक्के लागला असून, त्याखालोखाल तेल्हारा तालुक्याचा निकाल ८८.१७ टक्के लागला. इयत्ता दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच कलमापन चाचणीतून जिल्ह्याची दहावीतील शैक्षणिक प्रगती समोर आली आहे. कलमापन चाचणीमुळे दहावीतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे कोणत्या शाखेकडे जायचे, हे आतापासून निश्चित करता येणार आहे. पालकांनासुद्धा दहावीच्या निकालापूर्वीच पाल्यांची प्रगती किती आहे, हे कळले आहे. शासनानेसुद्धा मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समुपदेशन कक्षामध्ये विद्यार्थी व पालकांना करिअरविषयक समुपदेशन उपलब्ध करून दिले आहे.
दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेण्यात आली. चाचणीत मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे, हे स्पष्ट झाले. त्यानुसार स्थापन केलेल्या कक्षात विद्यार्थी व पालकांना समुपदेशन करण्यात येत आहे.डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.