लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोविड लसीकरणाला सुरुवात होऊन जवळपास १६ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दरम्यान विभागात ७६.८६ टक्के कोविड लसीकरण झाले असून, सर्वाधिक ९०.९८ टक्के लसीकरण अमरावती जिल्ह्यात झाले. विभागात अकोला जिल्हा दुसऱ्या स्थानी असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७५.९० टक्के लसीकरण झाले आहे.
कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असून, यामध्ये डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. मात्र, असे असले तरीही अनेकजण लस घेण्यास टाळत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या तुलनेत अकोल्यात बऱ्यापैकी लसीकरण सुरू आहे. प्रामुख्याने अमरावती विभागाचा विचार केल्यास अकोला जिल्हा कोविड लसीकरणात दुसऱ्या स्थानी आहे. विभागात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले, तर सर्वात कमी लसीकरण यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात केवळ ६३.३५ टक्के लसीकरण झाले आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना प्रत्येकजण कोरोना लसीच्या प्रतीक्षेत हाेते. १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल, म्हणून अनेकांना त्याची आतुरताही होती. प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर काहींना सौम्य प्रमाणात रिॲक्शन झाल्याचे दिसून आले. त्यानंतर लसीकरणाचा आकडा झपाट्याने घसरत गेला. वैद्यकीय कर्मचारी अपेक्षेच्या तुलनेत लस घेत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोना लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतरही कर्मचारी लस घेण्यास नकार दर्शवत असल्याने जिल्ह्यात कोविड लसीकरणाची स्थिती चिंताजनक आहे. आरोग्य विभागाने या लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.
जिल्ह्यांत आतापर्यंत झालेले लसीकरण (टक्केवारीत)
जिल्हा - लसीकरण
अकोला - ७५.९०
अमरावती - ९०.९८
बुलडाणा - ७३.६२
वाशिम - ७३.१३
यवतमाळ - ६७.३५
कुठे किती लसीकरण
अकोला - २,२७७
अमरावती - ५,०९५
बुलडाणा - ४,४१७
वाशिम - २,१९४
यवतमाळ - ३,२३३
डोसचा दुसरा साठा जिल्ह्यात कधी मिळणार?
कोविड लसीकरण मोहीम सुरू होण्यापूर्वीच विभागातील पाचही जिल्ह्यांना ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस उपलब्ध झाले होते. दरम्यान, आणखी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोविड लसीसाठी नोंदणी झाली. या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास ६१ हजार लसीचे डोस अकोला आरोग्य सेवा मंडळाला उपलब्ध झाल्याची माहिती आहे.
हा उपलब्ध लसीचा साठा लवकरच विभागातील पाचही जिल्ह्यांना वितरीत करण्याची तयारी आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत केली जात असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
कोरोनावरील लस सुरक्षित आहे. लाभार्थींनी लसीकरणाला घाबरू नये. कुठल्याही लसीकरणानंतर सौम्य प्रकारची रिॲक्शन येणे साहजिक आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला मंडळ