लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील काही भागात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली असून, आतापर्यंत ११ ते १२ टक्के बियाणे खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र १५ हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता आहे. कापसाचे सरासरी पेरणी क्षेत्र गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कायम आहे.गेल्यावर्षी कापसाला मागे टाकत सोयाबीनने आघाडी घेतली होती. जवळपास २ लाख ३० हजार हेक्टरवर सोयाबीन तर १ लाख २० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला होता. यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनची मागणी वाढली असून, एकूण बियाण्यांपैकी ९ हजार ३०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. यावर्षी २ लाख १५ हजार हेक्टरवर कृषी विभागाने सोयाबीनचे नियोजन केले आहे. कापसाचे गतवर्षीप्रमाणे १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र कायम आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टरसाठी कृषी विभागाने विविध खरीप पिकांचे नियोजन केले आहे. यामध्ये तूर ७० हजार हेक्टर, मूग ३१ हजार हेक्टर, उडीद २० हजार हेक्टर, ज्वारी २२,५०० हजार हेक्टर, बाजरी २२५ हजार हेक्टर, मका ३५० हजार हेक्टर, सूर्यफूल एक हजार हेक्टर तर तिळाचे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या विविध पिकांसाठी कृषी विभागाने ८० हजार ५९४ क्ंिवटल बियाण्यांची मागणी केली आहे. आतापर्यंत बाजारात ६४ हजार ३७८ क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहे.बाजारात सोयाबीनची मागणी असल्याची माहिती बियाणे विक्रेत्यांनी दिली. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. त्यांनी मान्सूनपूर्व काही पिकांचे नियोजन केले आहे. मूग, उडीद, तूर व ज्वारी बियाण्यांची अद्याप हवी तेवढी मागणी नाही; पण यावर्षी हा पेरा वाढणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात गत आठवड्यापासून ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस होत आहे. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली आहे; पण एक दमदार १०० मि.मी. पाऊस आल्यानंतरच शेतकरी इतर बियाणे खरेदी करतील, असा एकूण प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
अकोला जिल्ह्यात केवळ १२ टक्के बियाणे विक्री!
By admin | Published: June 09, 2017 3:53 AM