लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्यांचे स्वप्न भंगले आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ात खरीप हंगामातील मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे उत्पादनही कमी झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू व इतर पिकांचे उत्पादन चांगले होण्याचे स्वप्न रंगविले होते; परंतु गत रविवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, केळी ही फळपिके आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांच्या पेंड्या अवकाळी पावसात भिजल्या असून, गारपिटीच्या तडाख्यात हरभरा व गहू मातीत मिसळला. अवकाळी पावसात भिजलेला कापूस गळून मातीत मिसळला तसेच कांदा व इतर भाजीपाला पिकेही मातीत मिसळली. हाताशी आलेली पिके मातीत मिसळल्याने, पिकांचे उत्पादन बुडाले. त्यामुळे रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाचे शेतकर्यांचे स्वप्न भंगले आहे. त्यानुषंगाने हवालदिल झालेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची मदत शासनामार्फत मदत मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.
उमई परिसरात गारपीट; अकोल्यात पाऊसउमईसह जांब, जितापूर नाकट, खरप ढोरे, समशेरपूर परिसरात मंगळवारी रात्री जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा आणि तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर रात्री अकोला शहरात जोरदार पाऊस झाला. तसेच आलेगाव येथेही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
पंचनाम्यानंतर समोर येणार पीक नुकसानाचे वास्तव!अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी, जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यात केवळ ५ हजार ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ातील पीक नुकसानाचे वास्तव पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.
शेतात कापणीनंतर हरभर्याच्या पेंड्या अवकाळी पावसात भिजल्या आणि हरभरा मातीत मिसळला. तसेच भिजलेला कापूस मातीत मिसळला. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यामुळे पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे.-शिवाजीराव भरणेशेतकरी, रामगाव