अकोला, दि. १५- जिल्हय़ात गुरुवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धोक्यात आलेल्या खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. गत वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कपाशी व तूर इत्यादी खरीप पिके धोक्यात आली होती. पावसाअभावी जिल्हय़ातील काही भागांत सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्याने या पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दडी मारून बसलेला पाऊस केव्हा बरसणार, याबाबत शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात असतानाच, १४ सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हय़ात पावसाने हजेरी लावली. दुसर्या दिवशी गुरुवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास अकोला शहरासह जिल्हय़ातील अकोला, आकोट, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, तेल्हारा व बाश्रीटाकळी तालुक्यांत जोरदार पाऊस बरसला. रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास अकोला शहरासह परिसरात पाऊस सुरूच होता. दमदार पाऊस बरसल्याने पावसाअभावी धोक्यात आलेल्या सोयाबीन, कपाशी व तूर या खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पिकांसाठी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
अकोला जिल्हय़ात दमदार पाऊस!
By admin | Published: September 16, 2016 3:07 AM