अकोला : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे. त्यामुळे उन्हाळी पाणी न सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला असल्याने यावर्षी उन्हाळी भुईमूग व इतर उन्हाळी पिकांचा पेरा घटणार आहे.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हा मोठा सिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पांतर्गत आठ हजारांवर हेक्टरवरील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडले जाते. तथापि यावर्षी आजमितीस या प्रकल्पात केवळ ९.४० दशलक्ष घनमीटरच जलसाठा शिल्लक असल्याने रब्बी पिकांनाच पाणी सोडले नाही. त्यामुळे उन्हाळी पिकानांही पाणी मिळणार नसल्याने या धरणाच्या क्षेत्रातील पेरा कमी होणार आहे. पातूर तालुक्यात मोर्णा व निर्गृणा हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. मोर्णा प्रकल्पात आजमितीस ५.५० दशलक्ष घनमीटर म्हणजेच १३.२७ जलसाठा शिल्लक आहे. यात गाळाचे प्रमाण भरपूर असल्याने या प्रकल्पातील पाणी उन्हाळा पिकांना सोडणार का, असा प्रश्न शेतकºयांकडून विाचारला जात आहे. निर्गृणा प्रकल्पात ८.९२ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाची जलपातळी ०.५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ०.४३ टक्के एवढीच आहे. शून्य टक्क्याकडे वाटचाल करणाºया या धरणात यावर्षी उन्हाळी पिकांसाठी पाणीच नाही. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा धरणात, तर पावसाचे पाणी साठलेच नाही. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात मात्र बºयापैकी ८०.३४ टक्के जलसाठा आहे. पण, याही धरणातील पाणी रब्बीसाठीच मोजून देण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी साठा कमी असल्याने वाण धरणाच्या पाण्यावर सर्व भिस्त असल्याने या धरणातील पाणी सुरक्षित ठेवले जाणार असल्याचे वृत्त आहे.जिल्ह्यातील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने धरणाच्या क्षेत्रातील उन्हाळी पिकांचे क्षेत्र कमी होणार आहे. पण, ज्या शेतकºयांकडे विहिरी आहेत. त्यामध्ये बºयापैकी पाणी असल्यास तेथील शेतकरी उन्हाळी पिके घेतील. पण, बहुतांश ठिकाणी विहिरी व कूपनलिकांची पातळी घटली असून, उन्हाळी पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच फळपिकांवरही यावर्षी पाण्याअभावी परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.