अकोला : जिल्ह्यातील हत्तीरोगप्रवण असलेल्या अकोला, पातूर, बार्शीटाकळी या तीन तालुक्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आल्यानंतर या रोगाचा ‘एमएफ’ दर एकपेक्षा कमी झाला आहे. हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘पोस्ट एमडीए’ कार्यक्रम २२ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील निवडण्यात आलेल्या आठ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. ठरवून दिलेल्या पाहणी नियमानुसार प्रत्येक गावामधील पाच ते नऊ वयोगटातील ५० मुला-मुलींचे रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीअंती दूषित आढळलेल्या रुग्णांना डीईसी गोळ्यांचा एकूण १२ दिवसांचा उपचार करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पातूर तालुक्यातील शिर्ला, भंडारज, विवरा, पातूर, अकोला तालुक्यातील कासमपूर, कपिलेश्वर व मलकापूर, तर बार्शीटाकळी या गावांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर ‘टास’ सर्वेक्षण होणार असून, यामध्ये रुग्ण आढळून न आल्यास हत्तीरोग दुरीकरण झाल्याचे शासनाकडून घोषित होण्याची शक्यता आहे. सदर कार्यक्रम आरोग्य सेवा अकोला मंडळाचे उपसंचालक डॉ. आर. एस. फारुखी व सहायक संचालक आरोग्य सेवा (हि.) अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विवेक पेंढारकर यांनी केले आहे.