लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ ये त्या ५ फेब्रुवारी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी १0 वाजता होणार असून, या सोहळ्य़ाचे निमंत्रण राज्यपाल सी. विद्यासागर तसेच परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना देण्यात आले आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून दरवर्षी बी.एससी. कृषी, मत्स्य विज्ञान, वनशास्त्र, पशुसंवर्धन, सामाजिक विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान पदवी, पदव्युत्तर व पी.एचडी.चे १ हजार ५00 च्यावर विद्यार्थी पदवी ग्रहण करीत असतात. याच अनुषंगाने दरवर्षी ५ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाते. यासाठी राज्याचे राज्यपाल तसेच कृषी मंत्र्यांना निमंत्रित केले जाते. यावर्षीही कृषी विद्यापीठाने निमंत्रण दिले आहे. राज्यपाल यांची या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लाभल्यास त्यांचे विद्यार्थ्यांसमोर दीक्षांत भाषण होईल. या समारंभाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांच्यासह कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, कुलसचिव, माजी कुलगुरू , कृषी सर्व संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, ज्येष्ठ संशोधन शास्त्रज्ञ आदींची उपस्थिती राहील. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित केले जाणार आहे, तसेच रजत, कांस्य, पुस्तक व रोख पारितोषिके गुणवंतांना दिली जाणार आहे.दरम्यान, डॉ.व्ही.एम. भाले यांनी कुलगुरू पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांचा हा पहिला दीक्षांत समारंभ असल्याने कृषी विद्यापीठाने यावेळी दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी केली आहे.