अकोला: राज्यातील काही शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा लोकहितार्थ निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गत अकोला महानगरासाठी ५० ई-बस मंजूर करण्यात आल्या होत्या. ई-बसेस मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच पहिल्या टप्प्यात १० ई- बसेस केंद्रांकडून महापालिकेला मिळणार असून, या बसेस लवकरच शहरातील रस्त्यांवर धावण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून अकोलेकर नागरिक सिटी बसगाड्यांची प्रतीक्षा करीत आहेत. महापालिकेची सिटी बससेवा बंद पडल्यामुळे अकोलेकरांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ऑटो रिक्षाचालकांकडून लूट होत आहे. परिणामी ई-बससेवा लवकर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.महापालिकेच्या नियंत्रणाखाली २००३ मध्ये शहर बस वाहतूक सुरू झाली होती. आर्थिक डबघाईमुळे २०१० मध्ये ही सिटी बससेवा बंद पडली. त्यानंतर २०१७ मध्ये २० बस सुरू केल्या होत्या. परंतु २०२० मध्ये काही कारणांमुळे परत ही बससेवा बंद पडली. आता राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने ई-बस मंजूर केल्यानंतर खडकी येथे चार्जिंगसाठी डेपो उभारला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारतर्फे जवळपास १० कोटी रुपये अनुदान लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
मनपाचा लोगोअकोला महानगरपालिकेला केंद्र शासनाकडून ई-बसेस आधीच मंजूर करण्यात आल्या आहेत. बसगाड्यांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असून, काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच शहराला ई-बसेस मिळतील. अशी अपेक्षा आहे.-कविता द्विवेदी, आयुक्त तथा प्रशासन महानगरपालिका